वर्धा : प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ, सुतमाला व चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, सेलू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय सरनाईक आदी उपस्थित होते.
तत्पुर्वी नागराज मंजुळे यांनी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर सामाजिक संस्कार अधिक चांगल्या पध्दतीने रुजविणे सोपे असल्याचे संवाद साधतांना ते म्हणाले. फॅन्ड्री, नाळ, सैराट या चित्रपटाच्या निर्मिती बाबतही त्यांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या. नाळ या चित्रपटाचे चित्रिकरण विदर्भात झाले आहे. येथे अनेक जिल्ह्यांत चित्रपटासाठी चांगले लोकेशन असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
झुंड या चित्रपटाच्या निर्मितीसाठी नागपुरातील अनेक गल्ली, मोहल्यांमध्ये फिरलो. चित्रपटात अस्सल नागपुरी बाज आणण्यासाठी खुप दिवस येथील बोली भाषा, राहणीमान आदी गोष्टी आत्मसात केल्या. त्यामुळेच चित्रपटात जिवंतपणा येऊ शकल्याचे मंजुळे यांनी सांगितले.