वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तरुणांना स्वावलंबी व उत्कृष्ट भारत घडवण्यासाठी तयार करेल. हे धोरण बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांसह सर्वागीण शिक्षणप्रदान करत आहे. शनिवारी 2 एप्रिल रोजी शिक्षण राज्यमंत्र्यांचे विद्यापीठात आगमन झाले. त्यांचे हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी स्मृतिचिन्ह, शाल व सुतमाले देऊन स्वागत केले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नवचार आणि संशोधन या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. मुख्य अतिथी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी यावेळी संबोधित केले. ते म्हणाले. सर्वांना हिंदी भाषा आणि इतर भारतीय भाषा विशेषतः आपल्या मातृभाषेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करायचे आहे. उच्च दर्जाच्या शिक्षण संस्था विकसित करण्याच्या दिशेने सरकार अनेक पावले उचलत आहे. तसेच या शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमांच्या भाषांतरावर काम केले जात आहे. आम्ही स्थानिक व भारतीय किंवा द्विभाषिक भाषांमध्ये शिक्षणाचे माध्यम करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.