पुलगाव : देवळी तालुक्यातील घोडेगाव कोळणा येथील महिला शेतकरी राजश्री अविनाश भोपे यांच्या शेतातील तीन एकरामधील उभा ऊस जळून खाक झाला. ही घटना गुरुवार 31 मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली. यात शेतकरयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात तापमानाचा पारा वाढला असून, अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत.
घोडेगाव कोळणा येथील शेतकरी महिला राजश्री यांनी आपल्या शेतात वर्षभर ऊसाला खतपाणी दिले. लागवड केलेला ऊस बहरला असून कापणीस आला असताना, अचानक ऊसाच्या शेताला आग लागली. काही वेळातच उन्हामुळे उसाच्या सुखलेल्या पानाला आग लागून भडका घेत उभा असलेला संपूर्ण ऊस जळून खाक झाला. आगीत ऊस जळून राख झाल्याने शेतकरी राजश्री भोपे या हवालदिल झाली असून, प्रशासनाने योग्य पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.