वर्धा : मुलगी हरवल्याची तक्रार आईने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, ती गावातील युवकासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली. घरच्यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. कुटुंबीय मागावर असल्याचे कळताच या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला गावात मंगळवारी (ता. २९) उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शालिक ठाकरे (२६, रा. बेला, जि. नागपूर) याचे गावातील १५ वर्षीय मुलीवर प्रेम होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे. यातूनच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलाने मुलीकडील आणि स्वतःच्या कुटुंबाला माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यांना घरी परत येण्याची विनंती केली.
मात्र, ‘प्रेमसंबंध तोडले जातील, जेलमध्ये टाकेल’ म्हणून आम्ही परत येणार नाही असा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यांची माहिती मिळताच नातेवाईक कुर्ला येथे पोहोचले. दुरूनच कुटुंबातील सदस्य दिसताच कुर्ला शिवारातील शेतकरी कमलेश कांबळे यांच्या विहिरीत दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूरचे ठाणेदार प्रशांत काळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून प्रेमीयुगुलांचे मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.