तळेगाव (टालाटुले) : अज्ञात जनावराने गोठ्यात प्रवेश करून गोठ्यातील तब्बल दहा शेळ्या गतप्राण केल्या. यामुळे शेतीला शेळी पालनाची जोड देणाऱ्या शेतकरी बाळू महाजन यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. तळेगाव (टा.) येथील शेतकरी बाळू महाजन यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसाय सुरू केला आहें.
सोमवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्याकडील शेळ्या बांधल्यावर ते घरी परतले. पण मंगळवारी सकाळी गोठ्यात गेल्यावर त्यांना दहाही शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. त्यानंतर शेतकरी महाजन यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद वनविभागाने घेतली असून शेळ्या ठार करणारे जनावर कुठले याबाबतची अधिकची माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. वनविभागाने नुकसान म्हणून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी बाळू महाजन यांची आहे.