वर्धा : ‘माझ्याशी बोल, नाहीतर तुझ्या वडिलांना मारहाण करून मी स्वत: आत्महत्या करेन, असे म्हणत आरोपीने एकतर्फी प्रेमातून युवतीस शिवीगाळ करीत तिचा पाठलाग करून विनयभंग केला. ही घटना सावंगी येथे घडली असून, या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात १९ रोजी तक्रार करण्यात आली आहे.
१९ वर्षीय युवती रस्त्याने जात असताना, आरोपी सुमित सुनील मालवे रा.चंद्रपूर याने पाठलाग करून तिला रस्त्यात अडविले, तसेच माझ्याशी बोल, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मारहाण करून मी स्वत: आत्महत्या करेन, अशी धमकी देत, असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. अखेर युवतीने याबाबतची माहिती तिच्या घरच्यांना सांगितली. याप्रकरणी सावंगी ठाण्यात तक्रार दिली आहे. मागील काही दिवसांपासून एकतर्फा प्रेमातून युवतींचा छळ होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मात्र, तरी देखील पोलिसांकडून अशांवर कठोर कारवाई करण्याकडे कानाडोळा केला जात असल्याने नागरिकांत रोषाचे वातावरण आहे.