

समुद्रपूर : हैद्राबादकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली कार अनियंत्रित होत उलटली. यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांना दुखापत झाली असून, हा अपघात जाम-हिंगणघाट महामार्गावरील कोल्ही शिवारातील प्रकाश जिनिंग जवळ शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास झाला. आराधना मनिष अमलाथे, वेदांत मनिष अमलाथे, तसेच तेजस मनिष अमलाथे अशी जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, हैदाबाद येथील रहिवासी असलेले मनिष अमलाथे हे पत्नी आराधना व मुलगा तेजस, तसेच वेदांत यांच्यासह हैद्राबाद येथून नागपूरच्या दिशेने टी.एस. ०७ एच.पी. २२४६ क्रमांकाच्या कारने जात होते. भरधाव कार. जाम-हिंगणघाट मार्गावरील कोल्ही शिवारात आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना, कार रस्त्याच्या कडेला उतरून उलटली. यात कारमधील अमलाथे कुटुंबातील मनिष वगळता उर्वरित तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, जाम महामार्ग पोलीस चौकीचे सुधाकर कुमरे, देवेंद्र पुरी, नरेंद्र दिघडे, किशोर येळणे, ज्योती राऊत, दीपक जाधव, संतोष सपाटे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.