
वर्धा : नजीकच्या दहेगाव येथील नायरा एनर्जी या ऑइल डेपोतील टँकर चालक वामन जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली असून या टँकर चालकाला सिंदी रेल्वे येथील ओम साई पेट्रोलियमचे संचालक प्रकाश डफ यांनी नाहक त्रास दिला. त्यामुळेच वामन जाधव यांने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी नायरातील टँकर चालकांनी गुरुवारी रात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
दहेगाव येथील नायरा एनर्जी या डेपोतून वर्धा जिल्ह्यातील विविध भागासह जिल्ह्याबाहेरही पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जातो. या ठिकाणाहून दररोज किमान 300 टँकरच्या साहाय्याने पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होत असला तरी याच ऑइल डेपोतील टँकर चालक वामन जाधव यांनी आत्महत्या केली. वामन जाधव हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी असून ते मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील खापरी येथे राहतात. आत्महत्येची घटना नागपूर जिल्ह्यात घडली असली तरी त्याचे पडसाद वर्धा जिल्ह्यात उमटत आहेत.
शुक्रवारी नायरातील टँकर चालकांनी एकत्र येत कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे दिले. चालक वामन जाधव याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या प्रकाश डाफ याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. टँकर चालकांच्या या आंदोलनामुळे दहेगावच्या नायरा एनर्जी या ऑइल डेपोतील कामकाजाला ब्रेक लागला होता.