

वर्धा : सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात भरती असलेल्या 45 वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल 24 किलो वजनाचा गोळा (ट्युमर) शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या काढण्यात आला. ही जोखीमपूर्ण शस्त्रक्रिया सावंगी रुग्णालयात करण्यात आली असून, जागतिक महिलादिनी रुग्णाला दिलासा देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील गोळखा कारजी या आदिवासीबहुल गावातील अमसू नामदेव आत्राम या मागील चार वर्षांपासून सतत पोटाची वाढ होत असल्याने आणि त्यातून उद्भवलेल्या जीवघेण्या पोटदुखीमुळे त्रस्त होत्या.
परिसरात ठिकठिकाणी वेगवेगळे उपचार करूनही आजार बरा न झाल्याने परिचितांकडून माहिती प्राप्त होताच तिला सावंगी मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले. ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांनी विविध प्रकारच्या तपासण्या व चाचण्या पूर्ण करून शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या पोटातील अंडाशयातून मांसळ गोळा बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. डॉ. श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमरदीप शानू, डॉ. आसावरी देव, डॉ. सोनाली चव्हाण, डॉ. साक्षी शर्मा, डॉ. प्रीती वर्मा यांनी जागतिक महिलादिनी ही जोखीमपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णत्वाला नेली.
शल्यचिकित्सकांच्या या चमूला बधघिरीकरणतज्ज्ञ डॉ. संज्योत निनावे, डॉ. अमोल बेले, डॉ. पी. शिराज, डॉ. एस. कृष्णेन्दू, सिस्टर सुरेखा, गोकर्णा यांचे महत्त्वपर्ण सहकार्य लाभले. रुग्णाची प्रकृती पूर्णतः धोक्याबाहेर असल्याचे स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख डॉ. निमा अचार्य यांनी सांगितले.