वर्धा : शाळेत जात असलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा वर्दळीच्या ठिकाणी वाटेत अडवून विनयभंग करण्यात आला. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील वडनेर शिवारात घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कुणाल दशरथ दुर्गे (रा. वडनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पीडिता ही शाळेत जात असताना आरोपी कुणाल याने तिला वाटेत अडवून तिला लाजवेल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यावर तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पीडिता हिने कुटुंबीयांना सोबत घेत वडनेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कुणाल दुर्गे विरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीतून पीडितेने केली असून तशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांचीही आहे.