सेलू : तालुक्यातील मौजा कोटंबा शिवारातून गुलाबराव जाणबाजी लोणकर यांच्या शेतातील पिकांच्या ओलितासाठी नाल्यावर असलेली साडेसात एचपीची एलएन कंपनीची मोटार किंमत 16 हजार व 70 फूट केबल अंदाजे किंमत 1000 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. गजानन लोणकर यांनी सेलू पोलिसांत तक्रार केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, गुलाबराव लोणकर यांची मौजा कोटंबा शिवारात धपकी रोडवर शेती आहे. त्या शेतातील पिकांच्या ओलितासाठी नाल्यावर समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ मोटरपंप बसविला आहे. नाल्यातील पाणी मोटारद्वारे घेऊन शेतातील गव्हाच्या पिकाचे ओलित सुरू होते. शनिवारी लोणकर यांनी दिवसभर शेतात गव्हाचे ओलित केले. आज रविवारी सकाळी पुन्हा ओलित करण्यासाठी मोटरपंप सुरू करायला शेतात गेले असता त्यानां मोटार व केबल दिसून आला नाही. चोरट्यांनी पंपापासून मोटार व केबल चोरून नेल्याचे दिसून आले. गजानन लोणकर यांनी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत. शेतशिवारातून शेतीपयोगी साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्या असून ऐन ओलिताचे तोंडावर चोरट्यांनी डाव साधल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.