वर्धा : नगरपालिकेने मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मार्च एंडिंग जवळ येत असल्याने पालिकेने पाणीपट्टी व मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. थकीत कराची वसुली करण्यासाठी पालिकेने शहरातील 1275 मालमत्ताधारकांना जानेवारी महिन्यामध्येच जप्तीची नोटीस बजावल्याने थकबाकीदारांनी धास्ती घेतली आहे. पालिकेने 25 फेब्रुवारीपर्यंत जवळपास साडेसात कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे.
नगरपालिकेच्या वतीने 1 एप्रिल 2021 पासून 25 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 6 कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली केली आहे. तर दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी कर वसूल करण्यात आला आहे. नगरपालिकेला पाणीपट्टी, मालमत्ता व इतर कर असे एकूण 21 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 35 ते 40 टक्के थकीत कराची वसुली करण्यात आलेली आहे. मालमत्ता धारकाकडील थकीत कराची वसुली करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली असून, त्याद्वारे थकबीकादारांना कराचा भरणा करण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. आता मार्च एंडिंग जवळ येत असल्याने नगरपालिका प्रशासनाकडून थकबाकीदारांना कराचा भरणा करण्यासाठी आवाहन केले जात आहे.