पुलगाव : मोठ्या प्रमाणात देशी दारूसाठा शहरात आणत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी फत्तेपूर गावाबाहेरील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून कारमधून नेणारा दारूसाठा जप्त केला. पोलिसांनी वाहनासह एकूण ९ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकास बेड्या ठोकल्या. मात्र, दुसऱ्या आरोपीने पोलीस दिसताच शेतात उडी मारून पळून गेला.
पुलगाव पोलीस फत्तेपूर मार्गावर नाकाबंदी करीत असताना एम.एच.४५, ए. ८१२७ क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी खुशाल कुंभरे (रा. देवळी) हा पळून गेला. तर कृष्णा श्रावण करलुके (रा. नांदोरा) याला अटक केली. कारची पाहणी केली असता २८ हजारांचा देशी दारूसाठा मिळून आला. पोलिसांनी महागडा मोबाईल अन् वाहन असा एकूण ९ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शैलेश शेळके यांच्या नेतृत्वात खुशालपंत राठोड, शेखर नेहारे, महादेव सानप, मोहम्मद गौरवे, जयदीप जाधव, मुकेश वांदिले यांनी केली.