वर्धा : दुचाकीचालकाने भरधाव दुचाकी चालवून १३ वर्षीय बालकाला धडक देत त्याच्या उजव्या पायावरून दुचाकीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. नागपूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडली. हा अपघात साखरखेडा गावात ६ फेब्रुवारी रोजी झाला होता. याप्रकरणी २२ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आशिष अनिल ठाकरे हा घरासमोरील रहिवासी तेजस निवृत्ती भुरे याच्या एम.एच.३२ एपी, ८४४१ क्रमांकाच्या दुचाकीवर बसून रोहणा येथून भाजीपाला घेऊन साखरखेडा येथे जात असताना तेजस भुरे हा लघुरशकेसाठी रस्त्याकडेला थांबला. दरम्यान, आशिष हा दुचाकीजवळ उभा असतानाच आशिष शंकर उईके याने त्याच्या ताब्यातील एम.एच. ३२ आर. ८९४१ क्रमांकाची दुचाकी भरधाव चालवून आशिष ठाकरे याला जबर धडक दिली. तसेच दुचाकीचे चाक पायावरून गेल्याने पायाच्या घोट्याचा चुराडा झाला. दरम्यान, जखमी आशिषला गावातील नागरिकांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले; पण प्रकृती नाजूक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.