आर्वी : विरूळ येथील एका फोटो स्टुडिओतून बनावट शासकीय कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला, टीसी आदी कागदपत्रे आढळून आल्याने या दुकानाला सील लावण्यात आले होते. शुक्रवारी आर्वी तहसीलदार कार्यालयाच्या भरारी पथकाने दुपारी या दुकानाचे सील उघडून पुन्हा संगणकाची पडताळणी केली आहे. शाळेत शिष्यवृत्तीसाठी इतर कागदपत्रांसह उत्पन्नाचा दाखला जोडला जातो. शिवाय उत्पन्नाचा दाखला असल्याशिवाय पाल्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही.
इतकेच नव्हे तर शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला उत्पन्नाचा दाखला गरजेचा असतो, त्यामुळे तो आवश्यक कागदपत्रांमध्येच मोडतो; पण फोटो स्टुडिओतच अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक शाळा सोडल्याचे खोटे दाखले संगणकावर आढळून आल्याने नायब तहसीलदार विनायक मगर, अमोल कदम, स्मिता माने आदींच्या भुव्याच उंचावल्या. संबंधित एका विद्यालयात पाहणी केली असता दहापैकी चार टीसी बोगस असल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद शाळेचा टीसी असल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपण एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतो, असे या दुकानाचे संचालक नूतन गोविंद सोनटक्के (33 रा. विरुळ) याने महसूल पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे; पण अधिकची चौकशी केली असता नूतन याने मौन पाळले.