सेलू : तालुक्यातील वाहितपूर येथील जैविक शेती गुरुकुल व प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत गो आधारित नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प यावेळी केला. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी श्री. उरकुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत शास्त्रज्ञ डॉ. नासरे यांनी खनिज तत्वाद्वारे पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने माहिती दिली यात राॅक फाॅस्फेट, फ्लाय अॅश, फिश ऑइल , खत व्यवस्थापन आणि सूक्ष्म अन्न द्रव्य पूर्तता करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगितल्या.प्रा. डॉ दुबे सर यांनी रासायनिक शेतीचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि घरच्या घरी वैज्ञानिक माती परीक्षण करण्यासाठी पतंजली निर्मित धरती का डॉक्टर या किटच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविले.
माजी सैनिक प्रविण पेठे यांनी देशाच्या सिमेवर जवानांचे महत्व आणि अन्नदात्याचे महत्त्व विषद केले. जैविक शेतीमध्ये वेगवेगळ्या कल्चरचा वापर किती महत्त्वाचा आहे याबाबतचे मार्गदर्शन नैसर्गिक शेतीचे अभ्यासक श्री. चक्रधर भगत यांनी केले. नैसर्गिक शेतीतील यशस्वी प्रयोगाची माहिती भारत भोंगाडे यांनी दिली .तर नैसर्गिक शेतीचे अभ्यासक श्री. संदीपजी येळणे यांनी गो आधारित नैसर्गिक शेतीच्या विविध तंत्रा विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत प्रास्ताविक राजकुमार गव्हाळे यांनी केले तर मिनल येळणे यांनी आभार मानले.