वर्धा : हरिओम ग्रुप श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन का. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. लासलगांव जिल्हा नाशिक शाखा, वर्धा, हिंगणघाट, इत्यादी ठिकाणी संचालक मंडळाने शाखा उघडून या शाखांमध्ये कामकाजाकरिता पदे नियुक्त करण्यात आली. पण या क्रेडीट सोसायटीमध्ये कंपनीच्या वतीने मासिक पेंशन योजना, मुदत ठेव योजना लखपती ठेव योजना, इत्यादी गुंतवणुकीच्या रकमेवर जास्त टक्क्याने व्याजाचा लाभ व परतावा जास्त रकमेचा मिळणार असे सांगून गुंतवणुकदारांना आर्थिक गंडाच घालण्यात आला. हे प्रकरण तक्रारीनंतर आता तपासासाठी रिओपन झाले असून फसगत झालेल्या व्यक्तींना आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली आपबिती पुराव्या निशी मांडता येणार आहे.
या क्रेडीट सोसायाटीने फसवणूक केलेल्या प्रकरणी हिंगणघाट येथील सुधीर प्रभाकर सुपारे यांनी व सोबत इतर गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने सविस्तर चौकशी करून ढोकेश्वर क्रेडीट सोसायटी विरूद्ध दाखल असलेला गुन्हा पुन्हा नव्याने तपास करण्यात यावा यासाठी आर्थिक गुन्हे शाखेस आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार आता या प्रकरणाचा पुन्हा नव्या पावत्या व त्यांची किती रूपयांची फसवणूक झाली याबाबत कागदपत्रे असल्यास सर्व घेऊन बयाण नोंदविण्यास समोर यावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी केले आहे, जोमाने तपास केला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी सुचिस पोपटराव काळे हा सध्या नाशिक येथील काराग्रुहात आहे.