

सेलू : रस्त्यावर धावत्या मालवाहू वाहनाला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गांधी पेटोल पंपासमोर घडली. सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पाच अग्निशमन यंत्रासह अग्निशमन दलाच्या बंबने शेवटी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
काव्या मिनी ट्रान्सपोर्टचा मालवाहू पिकअप क्रमांक एम एच 15 डिके 5740 हा सिंदी (रेल्वे) येथून वर्ध्याच्या दिशेने जात होता. वर्धा येथे कुटुंबातीलच लग्नसोहळा असल्याने आंधण आणण्यासाठी निघालेल्या वाहनचालक मंगेश बेलखोडे यांनी सिंदी येथूनच डिझेल भरून तो निघाला. दरम्यान सेलू येथे गांधी पेट्रोक पंपाजवळ आपल्या मालवाहुचे ब्रेक लागत नसल्याचे वाहन चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर वाहनातून धूर देखील निघत असल्याने त्यांनी कसेबसे वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले व वाहनाबाहेर पडले.
एव्हाना संपूर्ण वाहनाला आगीने आपल्या कवेत घेतले होते. बघता-बघता द बर्निंग मालवाहू चा थरार अनेकांनी अनुभवला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पी एस आय कंगाळे, डिबी पथकाचे अखिलेश गव्हाणे व वाहतूक पोलिस शिपाई धनराज सयाम यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. यावेळी याच रस्त्याने महाजेनकोचे ज्युनिअर फायर ऑफिसर प्रतापसिंग येवतीकर आपल्या कुटुंबासमवेत प्रवास करीत होते. त्यांनी घटनेने गांभीर्य ओळखून लागलीच अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पाच सिलेडंरचा उपयोग केल्यानंतरही आग आटोक्यात आली नाही. शेवटी वर्धा येथील अग्निशमन दलाचा बंब आल्यानंतरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यावेळी काही काळ येथील वाहतूक देखील खोळंबली होती.