वर्धा : एटीएम कार्डची अदला-बदल करून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलिसांसह सायबर शाखेने समांतर तपास करून आरोपीला अटक केली. आरोपीने जिल्ह्यासह इतरही ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.
अनुप शिवनारायण पाझारे (३४) रा. सावित्रीबाई फुलेनगर, नागपूर, हल्ली मुक्काम टाकळघाट, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सरोज गणेश सतिजा (६१) रा. मालगुजारीपुरा या मगन संग्रहालयाजवळील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेल्या असता अनुपने त्यांना एटीएममधून पैसे काढण्याकरिता मदत करतो, असे सांगितल्याने सरोज यांनी त्याच्याकडे एटीएम कार्ड दिले.
याचवेळी अनुपने कार्डचा पिनही माहिती करून घेतला. लगेच त्याने या एटीएमची अदलाबदली केली आणि तेथून निघून गेला. काही वेळाने सरोज सतिजा यांच्या मोबाईलवर ७९ हजार ८४८ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. सायबर शाखेने आरोपीचा शोध घेऊन टाकळघाट येथून अटक केली. त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे १३ एटीएम कार्ड, एक मोबाईल जप्त केला. त्याने या गुन्ह्यासह देवळी आणि कळंब, यवतमाळ, चिमूर, कामठी या ठिकाणीही केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.