

वर्धा : सरकी, ढेपीचा ट्रक भरुन राजस्थान येथे पाठवूनही त्या मालाचे पैसे न दिल्याने व्यावसायिकाची ८ लाख २९ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी राजस्थान येथील चार जणांविरुद्ध हिंगणघाट शहरात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपेश अरुण चंदाराणा याचा ढेप व सरकी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने १५ डिसेंबर २०२० मध्ये दलाल महेंद्रकुमार केशव देवभाटी रा. झारीया राजस्थान याच्याशी संपर्क साधून सरकी, ढेप घेणारे मुरारीलाल पुरुषोत्तम शर्मा, रामस्वरूप चाहर, सुरेशकुमार रंजितसिंग चाहर रा. निराधुन याच्यासोबत भ्रमणध्वनीने बोलून सरकी व ढेपीचा सौदा केला.
त्यानंतर दलालाने पत्ता दिल्याने १७ मे २०२१ रोजी ४१९.०५ क्विंटल सरकीचा ढेप असा ९ लाख ९3 हजार १४८ रुपयांचा माल पाठविला. त्यानंतर पुन्हा ढेप तयार करून सुमारे ८ लाख २९ हजार ५४०० रुपयांचा माल पाठविला. करारानुसार मालाची रक्कम देणे आवश्यक असल्याने त्यांनी ९ लाख ९3 हजार रुपयांची रक्कम कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा केली; मात्र २०मे २०२१ रोजी पाठविलेल्या मालाची ८ लाख २९ हजारांची रक्कम पाठविली नसल्याने तपेश चंदाराणा यांनी वारंवार त्याच्याशी संपर्क करून रक्कम पाठविण्याची मागणी केली.
मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. फोन केला असता, तुमचे पैसे देत नाही, यापुढे फोन करायचा नाही, असे म्हणून फोन बंद केला. त्यामुळे तपेश यांनी पोलिसात महेंद्र देवाभाटी, मुरारीलाल शर्मा, रामस्वरूप चाहर, सुरेशकुमार चाहर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत असल्याची माहिती ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिली आहे.