वर्धा : राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने सगळीकडे शासनाने जाहिर केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हयातही सदर निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तसे नविन आदेश नुकतेच निर्गमित केले आहे.
साथरोग व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध प्रकारचे निर्बंध लागू केले होते. त्यानुसार जिल्हयातही सदर निर्बंध लागू करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने शासनाने नव्याने आदेश काढून शिथिलता देण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आदेश काढून काही बाबींवरील निर्बंध शिथिल केले आहे.
जिल्हाधिका-यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्हयातील सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी ऑनलाईन तिकिटांसह खुली राहतील. ज्यांची तिकीटे आहेत अशी प्रेक्षणीय स्थळे नियमित वेळेनुसार खुली राहतील. उद्याने सफारी व प्रेक्षणिय स्थळाला भेट देणा-यांचे पुर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
याठिकाणी एका वेळी 100 व्यक्ती किंवा क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच अनुमती असेल. ब्युटी सलून आणि हेअर सलून 50 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती राहणा-या व्यक्तींच्या संख्येवर आता मर्यादा राहणार नाही. या सर्व ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करणे मात्र आवश्यक आहे. नियमांचे उल्लघन करणा-यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आदेशात नमुद केले आहे.
महाविद्यालयांना अटींसह परवाणगी
जिल्हयातील शहरी व ग्रामिण भागातील अकृषक विद्यापिठे व त्याच्याशी सलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापिठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापिठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या सुरु करण्यास परवाणगी देण्यात आली आहे. लसीचे दोनही डोज झालेल्यांनाच उपस्थित राहता येईल. इतरांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणा-या परिक्षा ऑनलाईन होतील त्यानंतर विद्यापिठाने निर्णय घ्यावा.
विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने परिक्षा देण्याची सुविधा असावी. नेटवर्क नसलेल्या भागात परवाणगीने ऑफलाईन परिक्षा घेण्यात यावी. परिक्षा कालावधीसाठी विद्यार्थ्यांकरीता हेल्पलाईन व संकेत स्थळावर उपयुक्त माहिती देण्यात यावी. वसतीगृहे, टप्प्या टप्प्याने वरीष्ठांशी विचारविनिमय करुन सुरु करण्यात यावी. लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण घेण्यात यावे. असे आदेश सुध्दा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्गमित केले आहे.