

देऊरवाडा : आर्वी तालुक्यातील लहादेवी शिवारात पट्टेदार वाघाने पशुपालकाच्या गोठ्यात प्रवेश करून तब्बल चार शेळ्या ठार केल्या. ही घटना मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास घडली असून, यामुळे अब्दुल सादिक अब्दुल कादर यांचे मोठे नुकसान झाले आहे. अब्दुल सादिक अब्दुल कादर यांनी शेतीला शेळीपालनाची जोड दिली आहे.
त्यांनी शेतातील गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या. याच गोठ्यात मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश करून गोठ्यातील चार शेळ्यांना ठार केले. यामुळे अब्दुल सादिक अब्दुल कादर यांचे सुमारे ८० हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना उजेडात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ पाहणी करून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त पशुपालकाला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.