

समुद्रपूर : तालुक्यातील मोहगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वानरचुवा येथे अचानक लागलेल्या आगीत दोन गोठे जळून भस्मसात झाले. यामुळे सुमारे १ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद गिरड पोलिसांनी घेतली आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वानरचुवा गावाशेजारी असलेल्या अरुण तांदुळकर व अर्जुन बुधे यांच्या दोघांच्या मालकीच्या गोठ्यांना अचानक आग लागली.
बघता-बघताच आगीने रौद्ररूप धारण करून गोठ्यातील संपूर्ण साहित्याला आपल्या कवेत घेतले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. सुमारे एक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाअंति परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात नागरिकांना यश आले. आगीत अरुण तांदुळकर यांचा गोठा जळून राख झाल्याने त्यांचे ८० हजारांचे नुकसान झाले, तर शेजारी असलेल्या अर्जुन बुधे यांचा गोठा तसेच गोठ्यातील एक दुचाकी आणि दोन सायकल जळून कोळसा झाल्याने त्यांचे एक लाखांचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच पोलीस पाटील सुनील डाडुकर, सरपंच विलास नवघरे व गिरडचे ठाणेदार सुनील दहिभाते यांच्या मार्गदर्शनात राहुल मानकर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद गिरड पोलिसांनी घेतली आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.