तळेगाव (श्या.पंत) : नैसर्गिक गौण खनिज उपसा यासंदर्भात शासनाचे कठोर धोरण आहे, मात्र हे धोरण कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सर्रास अवैधरीत्या गौण खनिजाचा उपसा सुरू असल्याने कन्स्ट्रक्शन कंपनीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
एका कन्स्ट्रक्शन कंपनीने राष्ट्रीय महामार्ग तळेगाव -आष्टी- वरुड – गोणापूर या मार्गाच्या बांधकामासाठी लागणारा मुरुम जुनोना तालुका आष्टी येथील शेत सर्व्हे क्र. १४४ आराजी १.२७ हे. आर शेती संबंधित शेतकऱ्यासोबत ५ ऑगस्ट २०२० च्या स्टॅम्पनुसार करारनामा केला आहे. त्या शेतातून उत्खनन करून सोबतच महसूल विभागाच्या जुनोना भूमापन क्रमांक व उपविभाग १४३ आराजी ०.७८ हे. आर मधूनसुद्धा कंपनीने बेकायदेशीररीत्या उत्खनन केले. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
संबंधित कंपनीने मुरुमाचे उत्खनन करताना अप्पर वर्धा कालव्याच्या हद्दीतील कालव्याला लागून असलेला भूखंड पोखरून तसेच मुरुमाची वाहतूक करताना वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करून कालव्याची दुरवस्था केली आहे. त्यामुळे खड्डे निर्माण झाले असून, साचलेल्या पाण्याने लगतच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी किसान अधिकार अभियानाने तक्रार दिली होती; परंतु दखल घेण्यात न आल्याने तळेगाव येथील शिवसेना शहरप्रमुख विनोद डोंगरे, मनीष शेकार, आकाश सिंग टाक आदींनी निवेदन दिले.