

तळेगाव (श्या.पंत) : ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव असलेला ट्रक कंटेनरवर आदळल्याने दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव नजीकच्या उदयराज सभागृहाजवळ मंगळवारच्या पहाटे साडेपाच वाजतादरम्यान झाला. नगर येथून संत्रा घेऊन बंगालकडे जाणाऱ्या डब्ल्यू. बी.२५ के.९३३६ क्रमांकाच्या ट्रक चालकाने भरधाव वाहन चालवून अमरावतीकडून नागपूरकडे जाणाऱ्या एन.एल.०१ एल.७६२८ क्रमांकाच्या कंटनेरला ओव्हरटेक करण्याच्या नादात मागाहून जबर धडक दिली.
यात ट्रक चालक मोहम्मद कमाल मोहम्मद सदऊद्दीन (३४) व त्याचा सहकारी मोहम्मद सनाऊल्ला मोहम्मद बदऊद्दीन (४२) दोघेही रा. कुबडा जि. सहसा (बिहार) हे केबिनमध्ये दबून गंभीर जखमी झाले. तळेगाव पोलिसांना माहिती मिळताच जमादार गजानन बावणे, राजू शाहू, बालाजी मस्के, विजय उईके, चालक देवेंद्र गुजर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून आर्वी येथील ग्रामीण रूणालयात दाखल केले. या अपघातात ट्रक आणि कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.