आर्वीत गोबरगॅसच्या टाकीत आढळल्या अर्भकाच्या 11 कवट्या आणि 54 हाडं! आतापर्यंत पाच आरोपींना अटक

सतीश अवचट

वर्धा : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन अवैध गर्भपात केल्याचे जिल्ह्यात गाजत आहे. ज्या नामांकित रुग्णालयात 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात करण्यात आला, त्या इमारतीच्या मागे गोबर गॅसच्या टाकीत 11 कवट्या आणि 54 हाडं सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. आता डॉक्टर रेखा कदम यांच्या सासू आणि परिचारिकेलाही ताब्यात घेतले आहे. पीडितेचा 30 हजार रुपयांत अवैध गर्भपात केल्याचा आरोप डॉ. रेखा कदम यांच्यावर आहे. मात्र डॉ. कदम यांनी यापूर्वीही अनेक गैरप्रकार केल्याची चर्चा खरी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

न्यायालयात हजर केलं असता अल्पवयीन मुलाच्या आई आणि वडिलांची कारागृहात रवानगी करण्यात आली तर डॉ. रेखा कदम यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती.
वर्षांच्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अल्पवयीन मुलाच्या आई – वडिलांनी पीडितेचा 30 हजार रुपयांत गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली होती. आर्वी शहरात मॅटर्निटी होमच्या डॉ. रेखा कदम यांच्यासह तिघा जणांना आर्वी पोलिसांनी अटक केली होती. सहा जानेवारीला अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. गर्भपातासाठी लागणारा परवाना डॉ. रेखा कदम यांच्याकडे आहे का, असा सवाल विचारला जात आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे गर्भपाताआधी पोलिसांना कळवणं आवश्यक होतं, मात्र तशी कुठलीही पूर्वकल्पना न देता अवैध गर्भपात केल्याचं उघड झालं आहे.

रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागे गोबर गॅस टाकीत 11 कवट्या आणि 54 हाडं असं बायोमेडिकल वेस्ट ( जैविक कचरा ) सापडल्याने याआधी इथे आणखी अवैध प्रकार घडल्याचा संशय बळावला आहे. पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक आणि पालिका पथकाला पाचारण करुन डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले असता जमिनीत पुरलेले भ्रूण अवषेशांसह आढळून आले आहेत. आता रुग्णालयाची परिचारिका संगीता काळे आणि डॉक्टरांची सासू शैलजा कदम यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

रुग्णालयामागील खड्डा बायोगॅस प्रकल्पाचा होता. मात्र तो वापरात नसल्याने या खड्ड्यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. पंचांसमक्ष अनेक बाबी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात येणार आहेत. हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे ही बाब अहवाल प्राप्त झाल्यावरच कळेल. आर्वी शहरात राहणाऱ्या संबंधित अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिचे आई वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले असता ही बाब उघडकीस आली.

मुलगी गरोदर असल्याचे कळताच अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना गर्भपात करण्यास सांगितले. पोलिसांकडे वाच्यता केल्यास सर्व गावात बदनामी करु असे धमकावले मुलगी केवळ 13 वर्षाची असून मुलीची आणि आपली बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या आई वडिलांनीही त्यांचे म्हणणे ऐकले त्यानुसार स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांच्या दवाखान्यात मुलीचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला. यासाठी मुलाच्या घरच्यांनी 30 हजार रुपये दिले पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर कलम 376 ( 3 ) , 376 ( 2 ) ( एन ) , 312 , 313 , 315 , 341 , 201 , 506 , 34 भादवी सहकलम 4 6 21 ( 1 ) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here