

वर्धा : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता, आता शासनाकडून बालकांनाही लसीकरण केले जात आहे. शाळा स्तरावर ‘जॅपनीज’ ही लस विद्यार्थ्यांना मोफत द्यायची आहे. पण, याकरिता पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये प्रतिविद्यार्थी वीस रुपये घेतले जात असल्याची तक्रार पालकांनी केली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच हा प्रकार उघडकीस आला असून, पैसे परत करण्याच्या सूचना दिल्या.
या शाळेमध्ये लसीकरणाकरिता वीस रुपये आकारले जात असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्याकडे केली. त्यामुळे आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बडे, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी माधुरी सावरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदपाठक आदींनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांचा लसीकरणाकरिता शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून गटशिक्षणाधिकारी आणि त्यांच्याकडून शाळापातळीवर आदेश पाठविण्यात आला.
या लसीकरणाकरिता आरोग्य विभागाचा चमू शाळांमध्ये जाऊन लसीकरण करून देत आहे. या चमूला मोबदला द्यावा लागणार, असा संभ्रम निर्माण झाला. यातूनच शाळेने पालकांकडून वीस रुपये घेतल्याचे अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्याकडून घेतलेले पैसे तात्काळ परत करण्याच्या सूचना शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांना दिल्या.