वर्धा : कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. आरोग्य विभागासह पोलिस, ग्रामविकास, महसूल व नगरविकास विभागाने आपआपल्या स्तरावर कोरोना परिस्थिती हातळण्यासाठी उपाययोजना केल्या असून कोरोना रुग्णांना आवश्यकतेप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध होतील. सोबतच कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी सुध्दा विविध विभाग कार्यरत झाले असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज आयोजित पत्रकार परिषेदेत सांगितले.पत्रकार परिषेदेला जिल्हाधिका-यासह पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत उपस्थित होते.
कोरोनाच्या मागील काळात तीन ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. दरम्यानच्या काळात आपण जिल्हाभर मोठया संख्येने ऑक्सिजन बेडची संख्या वाढविली आहे. शासनाच्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालये अशा 11 ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध आहे. गेल्या वेळी 150 इतकी असलेली ऑक्सिजन बेडची संख्या 650 इतकी झाली आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयामध्येही ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे.
ग्रामिण भागात कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांना तेथेच उपचार मिळावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देखील कोरोना केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे. ग्रामिण भागातील रुग्णांना यावेळी शहरामध्ये यावे लागणार नाही. लसीकरणाचे दोनही डोस घेतलेल्या व्यक्तींना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी आहे. कोरोना झाला तरी लक्षणे सौम्य असतात. जिल्हयात 91 टक्के लोकांनी पहिला डोज घेतला असून दुसरा डोज घेणा-यांचे प्रमाण 60 टक्के आहे. हे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुसरा डोज घ्यावा, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिका-यांनी केले आहे. शासनाने जाहिर केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस विविध विभागांचे संयुक्त पथके तयार करण्यात आले आहे. निर्बंधांचे उल्लंघन झाल्यास सबंधितांवर कारवाई करण्यासाठी सहा विभागांना प्राधिकृत करण्यात आले आहे. असे पुढे बोलतांना जिल्हाधिका-यांनी सांगितले.
कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसाची भुमिका महत्वाची आहे. पोलिस विभागाने पथके नियुक्त केले असून रात्री सुध्दा पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी यावेळी केले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे 55 वर्षावरील पोलिस कर्मचा-यांना इतरांशी संपर्क येणार नाही अशा पध्दतीच्या जबाबदा-या सोपविण्यात आले असल्याचेही पोलिस अधिक्षकांनी सांगितले.