
वर्धा : शहरातील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात महिलांनी लंपास केली. पर्समध्ये २० हजार रुपये आणि इतर आवश्यक कागदपत्र होती. ही घटना सराफा लाईन परिसरात दुपारी 3 ते 3.३० वाजण्याच्या घडली असून, बाजारपेठेत महिला चोरांची टोळी सक्रिय झाली असून, महिलांना टार्गेट करीत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी लक्ष देत अशांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. रेखा केशवर दाऊतपुरे (रा. साईनगर) ही तिच्या बहिणींसह बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यांच्याजळ निळ्या रंगाची हॅण्डबॅग होती आणि त्यात दोन लहान पर्स होत्या, त्यात २० हजार रुपये होते. रेखा आणि तिच्या बहिणी बांगड्या पाहात असताना दोन अनोळखी महिला त्यांच्या जवळ आल्या, अन् बांगड्या पाहू लागल्या.
दोघींनीही चेहऱ्यावर मास्क बांधला होता. काही वेळाने पैसे देण्यासाठी पर्स काढली असता रोख रक्कम असलेल्या दोन्ही लहान पर्स चोरी झालेल्या दिसून आल्या. तसेच एटीएम कार्ड आणि आधार कार्डही लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, चोरट्या महिलांचा शोध घेण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.