वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाविरुद्ध भाजपा, येळाकेळी ग्रामपंचायत आणि जि. प. आणि पं. स समिती सदस्य सर्कलच्या वतीने शुक्रवारी सकाळी १० वाजता येळाकेळी बसस्थानक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. वर्धा-आर्वी मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आल्याने वेळाकेळी, सुकळी बाई गावातील अप्रोच रस्ते खाली गेल्याने नागरिकांना मोठा त्रास होत असून, अपघातात वाढ झाली आहे. याबाबत बांधकाम विभागाला अनेकदा सूचना करूनही दखल घेण्यात आलेली नाही, रस्त्यालगत सिमेंट नालीचे बांधकामही अपूर्ण असल्याने सांडपाणी गावात शिरत असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
मार्गालगत लावण्यात आलेले गट्टूदेखील निकृष्ट दर्जाचे असून, अल्पावधीतच फुटले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य रस्ते विकास निधीतून वर्धा-आर्वी मार्ग ते महाकाळपर्यंत सिमेंट रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आमदार भोयर यांच्या हस्ते उद्घाटनही झाले होते. पण, तीन वर्षे उलटले या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही. येळाकेळी- सेलू रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या दोन महिन्यांत उखडून गेल्याने नागरिकांना वाट काढणे अवघड झाले आहे. रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून ग्रामपंचायत व जि.प. सदस्य सोनाली कलोडे व लोकप्रतिनिधींनी केली आहे.
महाकाळ सिमेंट रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, यासाठी कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले. लेखी आश्वासन न मिळाल्यास शुक्रवारी ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, जि. प, सदस्य सोनाली कलोडे, पं. स. सदस्य बंडू गव्हाळे, सरपंच भारती चलाख, उपसरपंच रूपेश पिंपळे, वसंत करनाके, शीतल टगडकर, वंदना चलाख, अशोक येलोरे, भाऊराव कोहळे, ममता धोंगडे, उषा उडाण, हितेश भांडेकर, प्रियदर्शनी ठाकरे, विमल कंडे, राहुल येलोरे, अक्षय पवार, चेतन पवार, कृष्णराव इंगोले, विठ्ठल घुमे, शैलेंद्र सोनुलकर, गावकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.