

वर्धा : शहरात येणारा सुगंधित तंबाखूसाठा एलसीबीच्या पथकाने पकडला असून रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. सुमारे 3 लाख ६० हजार रुपयांचा सुगंधित तंबाखूसह दीड लाख रुपयांचा मालवाहू असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निळ्या रंगाचा मालवाहू गुरुवारी फिरत होता. दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने मालवाहू वाहनाची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूसाठा असल्याचे दिसून आले.
त्या कर्मचाऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जात मालवाहू जप्त केला. दरम्यान चालक आणि मालक फरार होण्यात यशस्वी झाले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष सुगंधित तंबाखूची मोजणी करण्यात आली. सुमारे १४ पोत्यांमध्ये सुगंधित तंबाखू भरून हा माल शहरातील विविध पानटपऱ्यांमध्ये विक्री केल्या जाणार होता. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.