वर्धा : ‘मेरे सैंय्या भये कोतवाल, तो डर काहेका’ या म्हणीप्रमाणे एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने गावातीलच एका तरुणाला चक्क आष्टीच्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसमक्षच सुंदरीने (पोलीसी प्रसादासाठी वापरण्यात येणारा पट्टा) मारहाण केली. हा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता इतक्यावरच थांबला नाही तर त्याने सदर तरुणाला त्याच्या गुप्तांगावर लाथ मारून गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे ही घटना चार दिवसांपर्यंत दडपण्यात आली. पण नंतर या बेदम मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. अखेर पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आरोपी स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यावर भादंविसह अनुसूचित जाती तथा अनुसूचित जनजाती अत्याचार विरोधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. परंतु, ज्या पोलीस निरीक्षकांसमक्ष हा प्रकार घडला त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस प्रशासनातील बडे अधिकारी काय कार्यवाही करतात, हे अद्याप गुलदस्त्यात असून त्याकडे आष्टी तालुक्यातील नागरिकांसह तक्रारकर्त्याचे लक्ष लागले आहे.
आरोपीस ठोकल्या बेड्या
पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्याकडून एका युवकाला पोलीस पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबरोबरच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी आपल्या चमूसह आष्टी पोलीस ठाणे गाठून सखोल माहिती घेतली. शिवाय आरोपी राजेश श्रीराम ठाकरे (३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अवघ्या काही तासांतच अटक केली आहे.