वर्धा : जिल्ह्यात सध्या वाळू चोरीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. विनालागत भरमसाठ पैसा मिळत असल्याने गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचाही यात हस्तक्षेप वाढला आहे. अशातूनच शुक्रवारी सकाळच्यासुमारास सेलसुरा परिसरात दोघांनी एकाचे हात पकडून तिसऱ्याने त्यांच्या कानशिलावर बंदूक ताणल्याची घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परंतु याप्रकरणी सावंगी पोलिसांत कुठलेही नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सावंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेलसरा परिसरामध्ये रेल्वे लाईनचे काम सुरू असून, या ठिकाणी वाळू टाकण्याच्या कामावरून दोन वाळू व्यावसाविकांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीपासून वाळू टाकणाऱ्या व्यावसायिकाला डावलून नव्याने या व्यवसायात उतरलेल्या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने वाळू टाकायला सुरुवात केली. यातूनच दोन वाळू व्यावसाविकांमधील वाद विकोपाला गेला. नव्याने आलेल्या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने सुरुवातीपासून वाळू टाकणाऱ्या व्यक्तीला धमकाविण्याकरिता त्यांच्या कानशिलावर बंदूक ताणली.
ही घटना लागलीच वाऱ्यासारखी पसरली असून वाळू व्यावसाविकांमध्ये दिवसभर चर्चा होती. बंदूक ताणणारा व्यक्ती हा देवळीतील वाळू चोर असल्याचे सांगितले जात आहे. आधीच अवैध वाळूचोरी प्रकरण देवळीतील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकाला चांगलेच भोवले. आता या वाळू चोरट्यालाही हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे. पण, पोलीस त्या दिशेने प्रयत्न करणार का? हा प्रश्नच आहे. वाळू चोरट्यांच्या अशा वर्तनाला वेळीच पायबंद घातला नाही तर हिंमत आणखी वाढणार.