वर्धा : वाहनात विविध साहित्य टाकून यात्रेकरिता जात असताना वाहन उभे करून जेवणासाठी थांबले असता अज्ञात चोरट्यांनी वाहनासह 2 लाख 55 हजारांचे साहित्य ल॑पास केले. ही घटना 28 डिसेंबर रोजी रात्री 9.15 वाजताच्या दरम्यान समुद्रपूर तालुक्यातील जाम चौरस्ता येथे घडली.
यातील फिर्यादी अशोक सूर्यभान बावणे (वय 55) हे हिंगणघाट येथे संत गाडगेबाबा यांची यात्रा असल्याने एम.एच. 27 एक्स 5705 क्रमांकाच्या वाहनामध्ये यात्रेकरिता लागणारे साहित्य टाकून 27 डिसेंबरला रात्री चालक व इतर कामगारासोबत कोरा येथून हिंगणघाट येथे आले. तेथे मुक्काम केल्यानंतर सकाळी हिंगणघाट येथील यात्रेत दुकान लावून सांयकाळी वाहनाने साहित्य टाकून परत तळोदी येथे यात्रेकरिता निघाले. रात्री 8.45 वाजताच्या दरम्यान जेवण करण्याकरिता जाम चौरस्ता शिवमंदिर येथे गाडी उभी केली. जेवण करून परत आले असता वाहन क्रमांक एम.एच. 27 एक्स 5705 हे दिसून आले नाही.
चोरट्यांनी वाहन किंमत 1 लाख 50 हजार, जनरेटर 25 हजार, लहान मुलांचा खेळण्याच झुला, मिकी माऊस, घसरगुंडी, एक जंपिंग खेळणे, सिलेंडर शेगडी व इतर साहित्य किंमत 80 हजार असे एकूण 2 लाख 55 हजार रुपयांचा माल चोरट्याने ल॑पास केला. या प्रकरणी अशोक बावणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.