वर्धा : अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घराला टार्गेट करून घरातील तब्बल १४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना कारला रोड परिसरातील विजयानंद घाटे यांच्या घरी घडली असून, परिसरातील नागरिकांत चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
गडचिरोली येथील रहिवासी असलेल्या नातेवाइकांकडे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविण्यासाठी विजयानंद घाटे व त्यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गडचिरोली येथे गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या कुलूपबंद घराला टार्गेट करून घरातील कपाटातील रोख तीन हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण १४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. गडचिरोलीवरून परतल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच विजयानंद घाटे यांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळ जाठून पंचनामा केला. या प्रकरणी विजयानंद घाटे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.