जलशुद्धीकरण केंद्रात साचला गाळ! पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद

हिंगणघाट : पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचून असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पालिकेच्या जलप्रदाय विभागाचा गळथान कारभार उघडकीस आला आहे. जुन्या जलकेंद्राला नवनिर्मित जलकेंद्राची जोडणी करण्यासाठी शहरातील नळयोजनेचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत नव्याने उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा विभागाच्या अधिकाऱयांनी भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. जनतेला मात्र आजसुद्धा पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. जुन्या जलशुद्धिकरण केंद्रात साचलेला गाळ नष्ट करण्यासाठी क्लेरिफ्लोक्युलेटरमध्ये यंत्रणा अस्तित्वात आहे. परंतु, याकडे पालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने या कुंभात जवळपास 4 फुटाच्यावर चिखल साचलेला आहे. आता हा गाळ स्वच्छ करण्याची जबाबदारी पालिकेवर येऊन पडली आहे.

गाळ साफ करण्याकडे पद्धतशिरपणे दुर्लक्ष केल्या जात असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे दिसून येते. नवीन जलशुद्धिकरण केंद्राची तसेच जुन्या जलशुद्धीकरण केंद्रासोबत जोडणीच्या कामाची पाहणी करण्याकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता चंद्रीकापुरे यांनी भेट दिली असता सदर प्रकार उघडकीस आला. सदर जोडणी करण्यासाठी जुन्या जलशुद्धीकरण केंद्राची टाकी रिकामी केल्यानंतर हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here