सिंदी (रेल्वे) : शहरातील मस्तांशा दर्गा परिसरात राहणाऱ्या दोन वयोवृद्ध महीला तुरीच्या शेंगा तोडाला रेल्वे लाईन लगतच्या मक्त्याने करीत असलेल्या शेतात गेल्या असता रेल्वे रुळा ओलांडताना एकाच वेळी दोन्ही बाजुनी रेल्वे गाड्या आल्याने गोंधळून झालेल्या अपघातात दोन्ही महीला जागीच मृत्यू मुखी पडल्याची घटना बुधवारी( ता. २२) शहरालगतच्या रेल्वेच्या एक तोंडया पुलाजवळ दुपारी ३:३० दरम्यान घडली.
सविस्तर वृत असे की शहरातील मस्तांशा वार्डातील रहीवाशी रामदास चौधरी झाडे नामक शेतमालकाचे शेत मक्त्याने करतात. या शेतात रामदासजीची पत्नी लताबाई वय ५० वर्षे या सोबत घराजवळील मेंहमुदा रोशन शहा वय ६० वर्षे यांना घेऊन नवारीच्या तुरीच्या शेंगा आणायला गेल्या होत्या. सदर शेतात जाताना रेल्वे लाईन ओलांडून जावे लागते. शेंगा तोडुन परत घराकडे येतांना रेल्वे रुळा ओलांडताना एकाच वेळी दोन्ही बाजुनी रेल्वे गाड्या आल्याने गोंधळून झालेल्या अपघातात दोन्ही महीला जागीच मृत्यू मुखी पडल्याची घटना बुधवारी (ता २२) दुपारी ३:३० वाजता घडली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सिंदी पोलिस आणि रेल्वे पोलीस पोहचुन घटनेचा पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथे पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.