उपचारांसाठी गेलेल्या महिलेच्या बॅगमधून रोखेसह दागिने केले लंपास! कस्तुरबा रुग्णालयातील प्रकार; सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल

वर्धा : डोक्याच्या आजारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुणालयात उपचारांसाठी एमआरआय कक्षात गेलेल्या महिलेच्या बॅगमधील दागिने आणि रोख रक्कम अज्ञात महिलेने चोरून नेली. ही घटना सेवाग्राम रुग्णालयात घडली.

प्राप्त माहितीनुसार, सुलोचना श्याम नंदाने रा. चांदुर ढोरे, जि. अमरावती ही कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे डोक्याच्या आजाराच्या उपचारांसाठी गेली होती. तिला एमआरआय करण्यासाठी पाठविले असता ती खोलीच्या बाहेर अंगावरील दागिने काढून बॅगमध्ये ठेवून ती बॅग भाऊ संजय मांढरे यांच्याकडे देऊन स्कॅन करण्यासाठी गेली. एमआरआय स्कॅन करून बाहेर आली असता बॅगमधून चोरट्याने सोन्याचे दागिने, सोन्याचे मणी, डोरले, मंगळसूत्र तसेच कानातले आणि ४ हजार रुपये रोख असा एकूण 3१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलेला दिसून आला. त्यांनी याप्रकरणी लगेच सेवाग्राम ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. सेवाग्राम येथील रुग्णालय परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असल्याने रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here