

वर्धा : कर्तव्यावर असलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायालय व्ही. पी. आदोणे यांनी दिला. आरोपी आशिष नामेश्वर खिरडकर (३०, रा. कुरझडी, जा.) याला भादंविच्या कलम ३५३, ३३२, २९४ नुसार एक वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणातील पीडिता ही ग्रामसेविका असून, त्या त्यांच्या सहकाऱ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत होत्या. दरम्यान, आरोपीने तेथे येऊन मला घर बांधण्याकरिता जागा द्या, असे म्हणून वाद घातला व शिवीगाळ करीत हल्ला चढविला. इतकेच नव्हे तर पीडितेचा विनयभंग केला.
याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर प्रकरणाचा तपास पूर्ण केला व प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. याप्रकरणी चार साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजुचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन न्या. आदोणे यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली. अँड. एच. बी. रणदिवे यांनी शासकीय बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून भारती कारंडे यांनी काम पाहिले.