वर्धा : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिला डांबून ठेवणाऱ्या आरोपींना दोन वर्षाच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी दिला. न्या. आदोने यांनी आरोपी श्यामप्रसाद गणेशप्रसाद शुक्ला व जयश्री श्यामप्रसाद शुक्ला (दोन्ही रा. जनतानगर, आर्वी) यांना भादंविच्या कलम ३६३, ३६८, ३४ नुसार दोन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५५७ (१) अन्वये पीडितेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
पीडिता ही ४ फेब्रुवारी २०१३ ला सकाळी ६ वाजताच्या सुमारास शाळेत जाते म्हणून घराबाहेर पडली. पण, उशीर होऊनही ती परतली नसल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी आर्वी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. या प्रकरणातील आरोपींनी विधि संघर्षित बालकाच्या मदतीने फिर्यादीचा बदला घेण्याच्या उद्देशाने संगनमत करून पीडितेला फूस लावून पळवून नेले. शिवाय तिला घरातील पहिल्या माळ्यावरील शौचालयावरील स्लॅबवर डांबून ठेवले. पीडितेस आरोपीच्या घरी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यावर पोलिसांनी छापा मारून . पीडितेची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एन. बुरडे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणी ११ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुराव्यांच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपींना शिक्षा ‘ ठोठावली. शासकीय बाजू अँड. प्रसाद प. सोईतकर यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून अजय खांडरे यांनी काम पाहिले.