
देवळी : चिखली शिवारात देवळी मार्गावर सोमवारी सकाळी दुचाकीसह अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने चिखली गावात खळबळ उडाली आहे. चौकशीअंती हा मृतदेह सचिन हनुमंत मडावी (वय 32) या तरुणाचा असल्याचे पुढे आले. देवळी तालुक्यातील केळापूर येथील सचिन मडावी हा युवक आपल्या पत्नीला आणण्याकरिता वरुड येथे जाण्यासाठी केळापूर येथून रात्री उशिरा 12-1 वाजताच्या दरम्यान आपल्या एमएच 31, बीडी 4954 क्रमांकाच्या दुचाकीने निघाला होता.
पण चिखली शिवारात त्याचा दुचाकीचा अपघात झाला. त्यात सचिनचा मृत्यू झाला. या अपघाताविषयी रात्रभर कुणालाच काही माहिती नव्हती. त्यामुळे रात्रभर मृतदेह घटनास्थळी पडून होता. सकाळी चिखली येथील नागरिक शेतात जात असताना मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला. देवळी पोलिसांना कळविण्यात आले. हा अपघात नेमका कसा झाला, याविषयी कळू शकले नाही.