वर्धा : जिल्ह्यातील तब्बल ७९ हजार ४६ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना महावितरणने विद्युत् जोडणी दिली आहे. असे असले तरी याच शेतकऱ्यांकडे विद्युत देयकापोटी तब्बल २०२.१८ कोटींची रक्कम थकल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनीही स्वत: पुढे येत विद्युत देयकाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
थकबाकीदारांकडून विद्युत देयकाची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेदरम्यान थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांची थेट विद्युत जोडणी कापली जात आहे. एकदा विद्युत जोडणी खंडित केल्यावर ग्राहकाला ही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी तसेच इतर विद्युत ग्राहकांनीही त्यांच्याकडील विद्युत देयक वेळीच अदा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.