

कारंजा (घाडगे) : कनिष्ठ महाविद्यालयातून ऑटोने आपल्या गावाकडे निघालेल्या चार विद्यार्थिनींना अपघाताला सामोरे जावे लागले. अनियंत्रित झालेला ऑटो दुभाजकावर धडकून उलटला. या अपघातात चारही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.
गेल्या एक महिन्यापासून एसटीचा संप असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झालेली आहे. त्यातच शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी विद्यार्थ्यांना खासगी वाहनात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याचा प्रत्यय मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयातून ऑटोमध्ये चार मुली राजनी येथे जात असताना आला. ओरिएंटल पाथवेच्या दुभाजकावर एमएच 32 ए 4686 क्रमांकाचा ऑटो अनियंत्रित होऊन उलटला. यात मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी करिष्मा चौधरी, हेमा चोपडे, कल्यानी गाडगे, रसिका आत्राम, सर्व रा. राजनी या गंभीर जखमी झाल्या. हा ऑटो राजनी येथील अविनाश पठाडे चालवीत होता.