समुद्रपूर : समुद्रपूर शहरातील वार्ड क्र. 2 मध्ये सिलिंडरच्या भडक्याने घराला आग लागून साहित्याची राखरांगोळी झाली. ही घटना 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान घडली. यात मोठे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गॅस चालू करताच भडका उडाल्याने घरातील साहित्यासह पैसे जळून खाक झाले. यात गरोदर माता ललिता पोटफोटे यांना आगीच्या विळख्यातून घराबाहेर निघण्यात यश मिळाले. मात्र, या आगीत घरातील सर्व साहित्य व घरात ठेवून असलेली रोख जळून खाक झाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या आगीच्या घटनेत ललिता गजानन पोटफोटे यांचे मोठे नुकसान झाले. गावातील नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.