आर्वी : सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस सिलिंडरचा भडका उडाला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील संसारोपयोजी साहित्याची राखरांगोळी झाली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे ४० हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी आर्वी येथील विठ्ठल वॉर्ड परिसरात घडली.
विठ्ठल वॉर्ड येथील रहिवासी लक्ष्मी रामभाऊ कोहरे (८०) यांचा मुलगा घराबाहेर गेला होता तर त्या शुक्रवारी सायंकाळी स्वयंपाक करीत होत्या. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. गॅस सिलिंडरच्या नळीने पेट घेतल्याचे लक्षात येताच वयोवृद्ध लक्ष्मी यांनी घराबाहेर पळ काढत आरडाओरड केली. लक्ष्मी कोहरे या मदतीसाठी हाक देत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने कोहरे यांच्या घराकडे धाव घेतली. सुमारे अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांति आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. असे असले तरी या आगीत कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने लक्ष्मी कोहरे यांचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले आहे.