वर्धा : महामार्गालगत असलेली दुकाने फोडून मुद्देमाल लंपास करणारी नागपूर येथील टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने गजाआड केली आहे. यात तिघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहेत. या आरोपींकडून २५ हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद आतीक मोहम्मद रफीक (२३) रा. मोमिनपुरा, सक्षम प्रेमनाथ मोनदेकर (२०) रा. गोळीबार चौक, हिमांशू उर्फ गट्टू विश्वजीत नांदगावे (२४) रा. मायानगर सर्व राहणार नागपूर या तिघांना अटक करण्यात आली असून शेख सोहेल उर्फ भांजा शेख मुखत्यार रा. बडा ताजबाज हा फरार आहे.
नागपूर अमरावती महामार्गा लगतच्या कारंजा येथील बसस्थानका जवळील किराणा दुकानात चोरी करुन २१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी संजय मोटवाणी यांनी २५ नोव्हेंबरला पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने नागपुरातील टोळीला अटक करुन त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या साहित्यासह २५ हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींना कारंजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. हे आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यांच्या अटकेकरिता नागपूर शहर येथील पोलीस अंमलदार प्रमोद शनिवारे, शंभूसिंग ठाकूर, यशवंत डोंगरे, नाझिरभाई, पंकज यांनी सहकार्य केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक गायकवाड, ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गोपाल ढोले, अशोक साबळे, निरंजन वरभे, रणजित काकडे, हमिद शेख, चंदू बुरंगे, राजू तिवसकर, दिनेश बोथकर, अनुप कावळे यांनी केली.