वर्धा : पाच लाखांचे तब्बल दोन कोटी बनवून देण्याचे आमिष देऊन व्यावसायिकाच्या हाती चक्क झेंडूची फुले देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने थेट देवळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा तसेच त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तळेगाव (टा.) येथील व्यवसायिक मधुकर खेलकर यांना लक्ष्मण नामक भोंदूबाबाने पाच लाखांचे दोन कोटी ५० लाख बनवून देण्याचे अमिष दिले. त्यावर विश्वास ठेऊन खेलकर यांनी भोंदूबाबाला पाच लाखांची रक्कम दिली. पण भोंदूबाबाने खेलकर यांची फसवणूक करून पैशांच्या जागी हाती चक्क झेंडूची फुले दिली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेलकर यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी लक्ष्मण नामक भोंदू बाबा तसेच अशोक चौधरी, ज्ञानेश्वर हिगे, अक्षय हिंगे आणखी एक असे एकूण पाच व्यक्तींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे.