

विजयगोपाल : विजयगोपाल येथील सामाजिक कार्यकर्ता रणजित महिपालसिंग धुमाळे गत दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू असताना कळंब तालुक्यातील खुटाळा कामट वाडाजवळच्या सावरगाव शेतशिवारात सोमवारी त्यांचा मृतदेह संशयास्पद आढळून आला. येथील शेतशिवारात फवारणी करीत असलेल्या मजुरांना सकाळी मृतदेह दिसून आला. याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून कळंब पोलिसांना त्याची माहिती देऊन पोलिस पंचनामा करण्यात आला.
मृतदेह शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालये कळंब पाठविण्यात आला. रणजित धुमाळे यांच्या अशा जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. रणजित हे सामाजिक कामाकरिता धावणारे व्यक्तिमत्त्व होते. अचानक बेपत्ता होऊन संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेहामुळे त्यांचा घातपात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. पुढील तपास कळंब पोलिस करीत आहे.