आर्वी : येथील मेघा पेट्रोलियम नामक पेट्रोल पंपावरून थेट पाणी मिश्रित पेट्रोल वितरित झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच आर्वी तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सदर पेट्रोल पंप गाठून पाहणी केली. शिवाय तपासणीसाठी पाठविले आहे, विशेष म्हणजे यापूर्वीही या पेट्रोल पंपावरून नागरिकांच्या वाहनात पाणी मिश्रित पेट्रोल वितरित झाले होते.
आर्वी येथील मेघा पेट्रोलियम नामक पेट्रोल पंपावरून पाणी मिश्रित पेट्रोल वितरित होत असल्याचें सोमवारी काही वाहनचालकांच्या लक्षात आले. वाहनात पेट्रोलचा भरणा केल्यावरही वाहने अर्ध्या रस्त्यातच बंद पडल्याने हा प्रकार उजेडात आला, त्यानंतर या घटनेची माहिती तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांना देण्यात आली. त्यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पुरवठा विभागातील सीमा महल्ले तसेच पुरवठा निरीक्षक अमोल पाटील यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी सदर पेट्रोल पंप गाठून पेट्रोलचे नमुने घेतले असता, नागरिकांना पाणी मिश्रित पेट्रोल वितरित होत असल्याचे पुढे आले. पाणी मिश्रित पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणी दरम्यान विनोद वरकड, पठाण यांचीही उपस्थिती होती.