कारंजा (घाडगे) : येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेल्यांना ३२ तास उपाशी ठेवण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे. कारंजा ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एक-दोन नव्हे तब्बल ३२ महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्यात. ज्या ठिकाणी या महिलांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली तेथे एकही रुग्ण खाट नव्हती. जमिनीवरच सतरंजी टाकून झोपण्याची व्यवस्था करण्यात आली.
या भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. या रुणालयात नेहमीच विषारी साप निघत असतानाही शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्यांना जमिनीवरच झोपविण्यात आले. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा मिळावी याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर आहे. पण त्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे पुन्हा एकदा गरजू रुग्णांना मनस्तापच सहन करावा लागल्याचे वास्तव आहे.कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेल्यांना ठेवले उपाशी! कारंजा ग्रामीण रुणालयातील प्रकार